
समाजासेवेच्या माध्यमातून समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचे भाग्य मिळते. ज्यांनी समाज घडविण्यासाठी योगदान दिले त्या ज्येष्ठांचा सन्मान राखणे व जे भविष्यातील देशाचे नागरिक होणार आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने माऊली सेवाभावी संस्थेची स्थापना केली गेली असल्याचे प्रतिपादन माऊली सेवाभावी संस्थेचे सचिव बंडोपंत पाटील,घानवडे यांनी केले.गर्जन ता. करवीर येथील अंगणवाडी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप व गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष व करवीर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग पाटील- सावर्डे, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील – कांचनवाडी,बी.आर. पाटील- हिरवडे खा. दादू सुर्वे – चाफोडी, पांडुरंग कोंडी पाटील -आरळे लक्ष्मी फौंडेशन गर्जनचे अध्यक्ष विनायक देसाई, तुकाराम कुंभार हे प्रमुख उपस्थित होते.
स्वागत प्रसंगी लक्ष्मी फौंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई म्हणाले, तुळशी परिसरातील जेष्ठानी एकत्र येऊन माऊली सेवाभावी संस्थेची स्थापना केली व समाज कल्याणचा ध्यास घेतला हे अभिमानास्पद आहे. भविष्यात संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
खजानीस बी. आर. पाटील म्हणाले, संस्थेच्या वतीने गावोगावी जाऊन शालेय मुलांना प्रोत्साहन देऊन शैक्षणिक पाया पक्का करण्यासाठी शालेय वस्तू भेट दिल्या जात आहेत. शिवाय ज्या जेष्ठ व्यक्तींनी गावाच्या विकासासाठी हातभार लावलेला असतो त्यांना सन्मानित केले जाते.भविष्यात सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
या वेळी एकनाथ आबा जगताप, बंडू बजाप्पा सावंत, एकनाथ पांडुरंग देसाई,गणपती संतू सावंत या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला व गर्जेन आणि सावंतवाडी येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप करण्यात आला.
या वेळी अंगणवाडी सेविका सुनंदा नाईक, लता कांबळे, गजानन भोसले, परसू सावंत, सचिन नाईक यांच्यासह ग्रामस्थ व पालक हजर होते.
फोटोपूजन विनायक देसाई यांच्या हस्ते झाले.
आभार लता कांबळे यांनी मानले.तेजश्री महेश नाईक यांनी सुत्रसंचालन केले.






