
संवादातूनच शाश्वत विकासाची वाट : जालिंदर पांगरे
सायबरमध्ये ‘सह्याद्री संवाद’ विशेषांकाचे प्रकाशन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
कोल्हापूर : ग्रामीण विकास आणि शेतीच्या प्रश्नांवर सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी गावपातळीवर संवादाची प्रक्रिया अधिक व्यापक होण्याची गरज आहे. शेतकरी, प्रशासन आणि समाजातील विविध घटकांमध्ये संवाद वाढला तर ग्रामीण विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले.
कोल्हापुरातील सायबर शिक्षण संस्थेत ‘आमचा गाव आमचा विकास मीडिया’ आणि ‘शाश्वत फाउंडेशन’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सह्याद्री संवाद’ विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यासह ‘शाश्वत वाटचाल पुरस्कार–२०२६’ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
पांगरे म्हणाले, “ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी आणि विकासाच्या विषयांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम ‘आमचा गाव आमचा विकास मीडिया’ आणि ‘शाश्वत फाउंडेशन’च्या माध्यमातून होत आहे. ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत अशा संवादाची आज गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता त्यातून प्रत्यक्ष कृती आणि सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक आहे.”
प्रभाकर पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना पांगरे यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. शासनाच्या योजना आणि शेतकऱ्यांमध्ये प्रभावी संवाद निर्माण झाला, तर योजनांचा लाभ अधिक परिणामकारकपणे तळागाळापर्यंत पोहोचू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायबर कॉलेजचे संचालक डॉ. आर. के. टेलर होते. ते म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात विकास साधायचा असेल तर संवादाची गरज असते. संवादातूनच समाज आणि देश पुढे जाऊ शकतो. मात्र, आज शेती आणि शेतकरी यांच्यामध्ये संवादाचा अभाव जाणवत असल्याने शेती करणाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. मागे वळून पुढे जायचे असेल, तर आपल्या मातीची जाणीव असणे आवश्यक आहे.”
तैवानसारख्या देशाचे उदाहरण देताना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त केली. मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीच्या विकासासाठी कशा पद्धतीने करता येतो, हे तैवानकडून शिकण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. “आपल्या मुलांनी मातीशी जोडले जाणे कमीपणाचे न मानता, आपल्या अस्तित्वाचे आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून माती आणि शेतीकडे पाहिले पाहिजे,” असेही टेलर यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एन. एम. पाटील यांनी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “समाजात बदल घडवायचा असेल तर संवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद शाश्वत असला पाहिजे. गावपातळीवर अशा संवादाची सुरुवात झाली, तर त्याचा सकारात्मक परिणाम गावच्या शेतीसह संपूर्ण विकासावर होईल. हा बदल केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता तालुका, जिल्हा आणि त्यापुढेही पोहोचला पाहिजे.”
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘शाश्वत वाटचाल पुरस्कार–२०२६’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये ग्रामीण व कृषी पत्रकारितेसाठी पत्रकार राजकुमार चौगुले, ग्रामीण समाजकारण, राजकारण आणि ग्रामसंस्कृतीच्या संशोधनासाठी संशोधक व प्राध्यापक डॉ. लखन भोगम, तर अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रातील कार्यासाठी सनरिच ग्रीन एनर्जीचे सचिन पार्टे यांचा समावेश होता.
ग्रामीण विकास, कृषी, पर्यावरण, शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तनाच्या विविध पैलूंवर संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘सह्याद्री संवाद’ विशेषांक प्रकाशित करण्यात आला. ग्रामीण भागातील सकारात्मक प्रयोग, विकासाची दिशा आणि समाजातील विविध घटकांमध्ये संवादाची गरज यावर या विशेषांकातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रास्ताविक प्रभाकर पाटील यांनी केले. डॉ. दीपक भोसले यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले. कार्यक्रमास शिक्षण, कृषी, उद्योग, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.






