कोल्हापूर, दि. १६ :
एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये मिशन एड्स सुरक्षा अंतर्गत कोल्हापूर जिल्हा संघर्षशील वर्गातून सक्षम कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. याकरिता राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील सर्व घटकांचे योगदान लाभले असून राज्यातील सुरक्षित प्लस वर्गवारी गाठण्यासाठी प्रत्येक गरोदर महिलेची एच.आय. व्ही., सिफिलिस व कावीळ तपासणी करणे अत्यावश्यक असून ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या. जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीमध्ये ते बोलत होते.
गुप्तरोग तपासण्यांवर भर दिला गेल्यामुळे गुप्तरोग संशयित येण्याचा आकडा वाढला आहे. अशा वेळेस निदान होण्याकरता तातडीने पुढील तपासण्या करणे गरजेचे आहे. त्या विना विलंब सर्व रुग्णालयांमध्ये व्हाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कावीळ तपासणी किट व फ्रिज ची उपलब्धता लवकरात लवकर करण्यात यावी. जिल्ह्यातील ट्रान्सजेंडरना मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड मिळण्यास येणारे अडथळे लवकरच दूर केले जातील अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. याबाबतची यादी सादर करण्यास सूचना दिल्या.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा देताना एड्स नियंत्रण कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा संघर्षशील वर्गामधून सक्षम मध्ये गेला असून सुरक्षितमध्ये जाण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनंदा गायकवाड यांनी युवा दिन मॅरेथॉन स्पर्धेत मुले व मुली दोन्ही गटांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे स्पर्धक राज्यांमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय आलेले असून पटना बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी या स्पर्धकांची निवड झाल्याचे सांगितले. देश पातळीवर राबविल्या गेलेल्या रिस्क असेसमेंट अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये प्रथम आला असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर एड्स नियंत्रण विभागाचे विशेष कौतुक केले.
यावेळी क्षयरोग, संपूर्ण सुरक्षा केंद्र, ए आर टी सेंटर , स्थलांतरित कामगारांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्या कामाचा आढावाही घेण्यात आला.
या वेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अ. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. बर्गे ,शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रूपाली यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.ए आर टी सेंटर चे वैद्यकीय अधिकारी , क्लस्टर प्रोग्राम ऑफिसर रमेश वर्धन, प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास विभाग प्रतिनिधी , माहिती अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी , लिंक एआरटी , आयसीटीसी,सुरक्षा केंद्र समुपदेशक बैठकीस उपस्थित होते








