कोल्हापूर :
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. मात्र, समाजातील काही वंचित मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळीचा आनंद घेता येत नाही. अशा मुलांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरविण्याच्या उद्देशाने नेटवर्क ऑफ कोल्हापूर सामाजिक संस्था, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक, सीपीआर हॉस्पिटल आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी विशेष दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅस्मिन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सरिता थोरात ,जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत
शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मुलांना कपडे, दिवाळी फराळ, अभ्यंगस्नानाचे साहित्य आणि शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
“मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविण्यासाठी घेतलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे असे उद्गार यावेळी डॉ. जॅस्मिन यांनी काढले. एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांसाठी दानशूर व्यक्तींनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे आणि दातृत्वाचे त्यांनी कौतुक केले.
एचआयव्ही सह जगणारी ही मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न व्हावेत असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी व्यक्त केले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी, दीपा शिपूरकर यांनी औषधांमधील सातत्याचे महत्त्व विशद केले.
एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांच्या भावनांना मोकळीक मिळावी याकरता उमेश चौगुले, मकरंद चौधरी यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले.
या कार्यक्रमाला आशिष तुर्कीया (कलापी स्टोअर्स), डॉ. ऋतुजा कदम, पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील, अंकुली कुलकर्णी, संजय देशपांडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुवर्णा गांधी आणि सुष्मिता भाकवे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी पोवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्नेहल मोघे यांनी केले. एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांच्या युवा गटातील सदस्य आणि एन.के.पी. प्लस संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.








