कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात स्वतःला ‘सूत्रधार’ समजून भाजपला डावलण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना खासदार धनंजय महाडिक यांनी कडक शब्दात सुनावले आहे. “भाजपला गृहीत धरून वेगळी राजकीय चूल मांडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. महायुतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच घेतील, स्थानिक नेत्यांना तो अधिकार नाही,” असा थेट इशारा देत महाडिक यांनी हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यांचा जोरदार समाचार घेतला. “आदर म्हणजे आत्मसमर्पण नाही! एकीकडे युतीची भाषा करायची आणि दुसरीकडे भाजपला वगळून पर्यायी गणिते मांडायची, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही,” असे महाडिक स्पष्टपणे म्हणाले. राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य मिळून ३५०० ठराव असल्याचा दावा करून भाजपची ताकद कमी लेखण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आकड्यांच्या राजकारणामागचा नेमका हेतू काय, हे जनतेसमोर आले पाहिजे. गोकुळच्या चेअरमनपदाच्या वेळी अरुण डोंगळे कोणाचे प्रतिनिधी होते आणि त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर काय घडले, हे जिल्ह्याला ठाऊक आहे. स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांवर खापर फोडणे हा पळपुटेपणा आहे. कोल्हापूरचे राजकारण असो वा गोकुळची निवडणूक, भाजपला डावलून कोणतेही राजकीय समीकरण पूर्ण होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.असा इशारा खा. महाडिक यांनी दिला.






