चंदगड,
राज्यातील जनतेचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे आणि वेळेत निदान व उपचार करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या काळात सेवा संकल्प अभियान राज्यभर राबविले जात असून,चंदगड ग्रामीण रुग्णालया मार्फत या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय चंदगडच्या वैद्यकीय अधीक्षक वर्ग – 1 डॉ. रश्मी माळगावकर यांनी सांगितले.
‘ सेवा संकल्प अभियान’ व ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झालेले असून गणपती मंडळाच्या सहकार्याने साधारण 1000 लोकांची सर्वरोग निदान तपासणी करण्यात आलेली आहे. जेष्ठ नागरिक दिनानिमित्त कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याच्या माध्यमातून ज्येष्ठांचे आरोग्य,ताण -तणाव,मुखाचा कर्करोग याबाबत माहिती देण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व निदान शिबिरे संपन्न झाली. हार्ट अटॅक आल्यास घ्यावयाची काळजी व तातडीचे उपायोजना म्हणून सीपीआर प्रशिक्षण आयोजन करण्यात आले. गरोदर मातांची तपासणी व आहाराबद्दल मार्गदर्शन, नगरपंचायत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी,ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करुन त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
17 ऑक्टोबर पर्यंत शाळा व महाविद्यालयात व्याख्यान,आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले असल्याचे डॉ. रश्मी माळगावकर यांनी सांगितले.








