गोपाळकुमार कळसकर
तालुका प्रतिनिधी, भुसावळ
भुसावळ : सातपुडा शिक्षण संस्था संचालित तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पालक मेळावा आयोजित करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी १५ सप्टेंबर रोजी ‘विद्यार्थी व पालक मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव इंगळे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष हरिभाऊ इंगळे, सचिव डॉ. शेषराव भोपळे, कोषाध्यक्षा डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर, पालक प्रतिनिधी अनिल इंगळे उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविराज उदासी आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राहुल तायडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. योगेश गवई यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच डॉ. शेषराव भोपळे व डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यामध्ये कौशल्य, शिस्त, आत्मविश्वास व जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी पालक व शिक्षकांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. पालक प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसंदर्भात पालकांच्या अपेक्षा व सूचना यावेळी मांडण्यात आल्या. अध्यक्षीय भाषणातून कृष्णराव इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्था, महाविद्यालय, शिक्षक व पालक यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच संस्कार, कौशल्य व आत्मविश्वास आत्मसात करून भविष्यात सक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पालक मेळाव्यामुळे पालक, शिक्षक व महाविद्यालय प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला. कार्यक्रमास तिन्ही महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जिव्हेश साळी व प्रा.सौ.अक्षता देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रविराज उदासी यांनी केले.






