कोल्हापूर,
दानशूर कणखर व दयाळू असलेल्या मराठा समाजाला रूढी परंपरेत न अडकवता मराठा समाज हा निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक बनायला हवा,प्रत्येकाने हातात हात घालून प्रगतीसाठी एकत्र येऊन मराठ्यांची प्रगती साधावी असा एल्गार कोल्हापुर येथे संपन्न झालेल्या सकल मराठा परिवाराच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आला. वर्धापन दिनासाठी राज्यभरातून मराठा समन्वयक उपस्थित होते. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. प्रल्हाद जाखले,सकाळचे वृत्तसंपादक तानाजी पोवार,इतिहास संशोधक शरद पाटील- पुणे, दुर्ग संवर्धक राम खुर्दळ – नाशिक,, राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे, डॉ. उत्कर्ष रुमाले,सचिन माने,सुनील कानूरकर,उदय मंडलिक, खंडू आहेर हे व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होते.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणाले, मराठा समाजातील तरुण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रामाणिकपणे परत करत आहेत याचा अभिमान आहे. छ. शाहू महाराजांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या सारथी संस्थेचे कार्य विस्तारण्याची गरज आहे. शाहू महाराज म्हणजेच प्रगती असून त्यांच्या विचाराप्रमाणे सारथीचे कार्य व्हावे.मराठा समाज एकत्र राहण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत. शिवव्याख्याते व दुर्ग संवर्धक राम खुर्दळ म्हणाले, दुर्ग संवर्धनासाठी मराठा समाज कार्यरत आहेच.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या गडकिल्ल्यांचे रक्षण करण्यासाठी मराठ्यांनी अग्रभावी असणे महत्त्वाचे आहे. छ. शिवाजी महाराज म्हणजे एक विचार आहे.छ.शिवाजी महाराजांचे विचार व कार्य मुलांमध्ये लहानपणापासूनच रुजविणे गरजेचे आहे.
शिवाजी विद्यापीठाचे उप कुलसचिव डॉ. प्रल्हाद जाखले यांनी मराठा समाजातील गरजूना शिक्षणासाठी मदत करुन पुर्ण समाज उच्च शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
इतिहासकार शरद पाटील -पुणे यांनी मराठा समाज हा पोशिंदा असून या समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले.
सकल मराठा समाज नाशिकचे खंडू आहेर यांनी सामाजिक कार्य करत असताना त्यामध्ये सातत्य राखणे,भविष्यात समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष देणे व मराठा समाजाने सातत्याने सेवाभाव जपण्याची गरज असल्याचे सांगितले.राज्यस्तरीय कामाचा आढावाही त्यांनी दिला.
प्रास्ताविकामध्ये कोल्हापूर समन्वयक विनायक देसाई यांनी सकल मराठा समाजामार्फत शिक्षण व्यवसाय व नोकरी या क्षेत्रात मराठ्यांना अहोरात्र मदत केली जात असून आरोग्य व आपत्तीच्या बाबतीत कोणतीही जात-पात पाहिली जात नसून आज पर्यंत सर्व जातीच्या शेकडो रुग्णांना मदत व रक्तपुरवठा केला असल्याचे सांगितले.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज प्रकरणे मोफत करून देणे व शैक्षणिक मदतीसाठी सुद्धा अग्रेसर असल्याचे सांगितले.
कोल्हापूर समन्वयक संताजी पाटील यांनी उपस्थितांना मराठा एकजुटीची शपथ दिली तर तुषार शिंदे यांनी गारद म्हटली.
सुनील कानूरकर, पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे यांचीही भाषणे झाली.
यावेळी राज्यभरातून उपस्थित असलेल्या जिल्हा समन्वयकानी आपल्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा देऊन मराठ्यांच्या प्रगतीसाठी एकजूट राखण्याचा ठराव केला.
सूत्रसंचालन निवेदिका प्रतिभा पाटील यांनी केले तर आभार समन्वयक धनील मंडलिक यांनी मानले.




