धाराशिव, दि. २६,
स्त्री रुग्णालय,धाराशिव येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे-गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत माता-बाल आरोग्य, नियमित लसीकरण, पोषण आणि कुटुंब नियोजन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर व्यापक जनजागृती करण्यात आली.
यंदाच्या गणेशोत्सव व आगामी नवरात्रोत्सवाची सांगड घालत ‘उत्सव आनंदाचा, संकल्प आरोग्याचा’ हा विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचवता येतो याच उद्देशाने गणरायाच्या आगमनासोबत निरोगी कुटुंबाचा संकल्प आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नारीशक्तीच्या आरोग्य संवर्धनाचा संदेश या वेळी देण्यात आला.
रुग्णालयातील लसीकरण सत्रादरम्यान उपस्थित माता व नागरिकांना बालकांचे वेळेवर व नियमित लसीकरण करणे, बालकांना योग्य वयात ‘व्हिटॅमिन ए’ देणे, तसेच संतुलित आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. गरोदर व स्तनदा मातांनी नियमित आरोग्य तपासणी करून फॉलिक ॲसिड व कॅल्शियमच्या गोळ्या वेळेवर घेण्याबाबत समुपदेशन करण्यात आले.
कुटुंब नियोजनामुळे माता आणि बालकाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर निरोध, छाया, अंतरा आणि कॉपर-टी या विविध पद्धतींची सविस्तर माहिती देऊन, नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यात आले. दाम्पत्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने योग्य पद्धतीची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले.
याशिवाय असंसर्गजन्य रोग प्रतिबंध, रक्तदानाचे महत्त्व आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. “निरोगी आई, निरोगी बालक आणि निरोगी कुटुंब हाच सशक्त समाजाचा पाया आहे. नागरिकांनी शासकीय आरोग्य सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे-गवळी यांनी या वेळी केले.
या उपक्रमास रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांची, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.



