कोल्हापूर दि. 31 :
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात आलेले आहे.दिवाळीच्या तोंडावर या कर्मचाऱ्यांना शासनाने गोड बातमी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असून कर्मचाऱ्यांच्या वतीने आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची गारगोटी येथे भेट घेण्यात आली.
एन.एच.एम.च्या आधीपासून गेली 25 वर्षे एड्स नियंत्रण कर्मचारी राज्यांमध्ये कार्यरत आहेत. शासन सेवेत सामावून घेण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी सुद्धा गेली अनेक वर्षे होत आहे.त्या दृष्टीने शासनाचे सकारात्मक पाऊल पडत असून मंत्रालयीन स्तरावर हालचाली चालू आहेत.
आता तुमचे काम झालेले असून तुम्ही शासकीय कर्मचारी झालेला आहात. या नंतर एड्स नियंत्रण कर्माचाऱ्यांचा विषय मार्गी लावायचा असून तेही काम लवकरच मार्गी लागेल असे एन. एच.एम. कर्मचारी भेटी प्रसंगी ना. आबिटकर यांनी सांगितले.
आरोग्य खात्याचे जबाबदार पालक या नात्याने ना. प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या या महत्वपूर्ण वक्तव्यामुळे एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचे काम दृष्टिक्षेपात आल्याचे दिसत असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. राज्यातील एच.आय.व्ही. संसर्गितांची आकडेवारी कमी करणे, एड्स आटोक्यात आणणे व एड्स नियंत्रणामध्येमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर ठेवणे यामध्ये या कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून गेले अनेक वर्षे हे कर्मचारी अगदी कमी मानधनांमध्ये काम करत आहेत. रुग्णांच्या आयुष्याला उभारी देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेतल्यास त्यांना न्याय मिळणार आहेच पण या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा शासनाला आरोग्य यंत्रणेमध्ये होणार आहे.








