
कोल्हापूर दि. 21 :
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई मार्फत राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर रेडरन मिनी मॅरेथॉन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले गेले . या स्पर्धांमधून प्रथम व द्वितीय आलेल्या विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धा यावर्षी दि. 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे. महाविद्यालयीन स्तरावर १७ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी रेडरन मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.तर इयत्ता ८ वी,९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांकरिता रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. कोल्हापूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क ते सायबर चौक परत शेंडा पार्क या मार्गावर रविवारी सकाळी ६.०० वाजता ही स्पर्धा संपन्न होणार असून राज्यभरातून स्पर्धक या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत.
सकाळच्या सत्रात, राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय इंटेन्सीफाईड आय.ई.सी.कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात येईल.यावेळी जिल्हयातील आमदार, खासदार,मा.महापौर,उपमहापौर,आयुक्त आरोग्य (नागरी) व प्रकल्प संचालक, महराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,मुंबई डॉ.सुनिल भोकरे,जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, आरोग्य संचालक व अति.प्रकल्प संचालक डॉ.विजय कंदेवाड हे उपस्थित राहतील.या अभियानांतर्गत गावपातळी,महाविद्यालय,शाळा स्तरावर संवेदीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
युवा वर्गामध्ये एचआयव्ही एड्स व लैंगिक संक्रमित आजारांबाबत (STI) जनजागृती करणे, सुरक्षित आरोग्य विषयक सवयीबाबत माहिती देणे, एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींविषयी असलेला कलंक व भेदभाव कमी करणे. तसेच एचआयव्ही प्रतिबंध, तपासणी व उपचार सेवा बाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
राज्यस्तरीय इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन सन २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यांचा सन्मान,एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच लोककला पथकाचे सादरीकरण आणि विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण याप्रसंगी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांचा सक्रिय सहभाग वाढवून भेदभाव मुक्त आणि एचआयव्ही मुक्त भविष्यासाठी जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.अशी माहिती राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यक्रम समन्वयक रोशनी कदम,जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ. सरिता थोरात व जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी दिली. .








