
पेठवडगाव : हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील दारूचे व्यसन असलेल्या भावाच्या त्रासाला कंटाळून लहान भावाचा मोठ्या भावाने खून केला.
आरोपी अमर बापूसो चव्हाण (वय ३३) असे मृताचे नाव असून, भाऊ किशोर बापूसो चव्हाण याच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
किशोर याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृताची पत्नी पियुषा अमर चव्हाण (वय ३०) यांनी फिर्याद दिली.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास दारू पिऊन पुन्हा अतिमद्यपान करून अमर किशोरच्या घरी आला. घराच्या दरवाजावर लाथ मारत आरडाओरडा करू लागला. संतापलेल्या किशोरने तू दररोज त्रास देतोस तुला आता जिवंत ठेवत नाही,असे म्हणत त्याच्या पोटात सुरीने वार केला.अमरला पोलिसांनी रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अमर यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुली व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. पोलिस निरीक्षक गोरख चौधरी अधिक तपास करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि वडगाव पोलिस निरीक्षक गोरख चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुरेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील व पथकाने किशोर चव्हाण याला अटक केली.








