
धाराशिव, दि. ७ :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत स्त्री रुग्णालय, धाराशिव येथे जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना “शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान – जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा” ही होती. या उपक्रमाच्या माध्यमातून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनपानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ उपस्थित होते.
प्रास्ताविकात वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. मधुकर सूर्यवंशी यांनी स्तनपानाचे माता व बालकांच्या आरोग्यातील अनन्यसाधारण महत्त्व विशद करताना जन्मानंतरच्या पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे, नवजात बाळाला पहिले पिवळसर दूध (कोलोस्ट्रम) देणे, जन्मापासून सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देणे तसेच त्यानंतर पूरक आहारासोबत दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान सुरू ठेवण्याचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. स्तनपानामुळे बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो, बालकाची शारीरिक व बौद्धिक वाढ चांगली होते तसेच मातेलाही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात असेही त्यांनी सांगितले.
डॉ. शैलेंद्र चौहान म्हणाले,स्तनपान ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया नसून नवजात बालकाला मिळणारी सर्वोत्तम जीवनदायी भेट आहे.स्तनपानाबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कुटुंबातील सदस्य यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. धनंजय चाकूरकर म्हणाले,स्तनपानामुळे बालमृत्यू कमी होण्यास मदत होते.तबालकांच्या सुदृढ भविष्यासाठी स्तनपान हा सर्वात प्रभावी उपाय आहे .
डॉ. स्मिता सरोदे यांनी स्तनदा मातांना नियमित समुपदेशन, योग्य मार्गदर्शन व आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. सचिन रामढवे व डॉ. दापके देशमुख यांनीही स्तनपानाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक फायदे सांगत सर्व मातांनी स्तनपानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले.
बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्तनपान जनजागृतीपर पथनाट्य सादर केले .
कार्यक्रमात रुग्णालयातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, मेट्रन पल्लवी चव्हाण, माधुरी जाधव, इन्चार्ज मनीषा साळुंके, मंगेश सुरवसे, विविध विभागांचे इन्चार्ज, स्टाफ नर्स, कार्यालयीन कर्मचारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन रिबेका भंडारे यांनी केले, तर डॉ. सचिन रामढवे आभार मानले.









